कॉलेज स्थापनेचा इतिहास - ४

ता. ३ सप्टेंबरला संस्था रजिस्टर करून युनिव्हर्सिटीच्या तपशिलाप्रमाणें अर्ज भरण्याचे तयारीस लागलो. त्या अर्जात तपशिलाच्या अनेक बाबी असतात. प्रिन्सिपॉल कोण, स्टाफ कोण कोण माणसें आहेत, जागा कोणती, वगैरे बाबी अर्जात भरणे आम्हांस शक्य झालें नाही. परंतु जेवढी माहिती भरतां येणे शक्य होती तेवढी भरून अर्ज १५ सप्टेंबरला नेऊन दिला. तोपर्यंत संस्था रजिस्टर झाल्याचें सर्टिफिकेटही आमच्या हाती आले नव्हतें. कारण त्यांत काही तांत्रिक अडचण आल्यामुळे संस्था रजिस्टर झाली नव्हती. त्या अडचणींचा शोध घेऊन त्यांचे निराकरण प्रि. नानासाहेब घारपुरे यांचे सल्ल्याप्रमाणें १५ तारखेला केले, व संस्था रजिस्टर झाल्याचें सर्टिफिकेट १७ सप्टेंबरला हाती आलें व मागाहून ते युनिव्हर्सिटीकडे पाठविण्यात आलें.

अर्ज केल्यानंतर एका महिन्यांत दोनचार गृहस्थांची एक कमिटी निवडण्यांत येते, व ती अर्जातील माहितीप्रमाणे सर्व व्यवस्था आहे कीं नाहीं ते पाहून डिसेंबरपर्यंत आपला अभिप्राय कळविते, व त्यानुसार फेब्रुवारीत सिंडीकेट ठराव करून मान्यता देते व नंतर जूनमध्ये कॉलेज सुरू करतां येते. अर्ज दाखल झाल्याबरोबर कमिटी निवडण्यात आली. त्यांत श्री. आडवानी, मोडक, गुपचूप व कारेकर असे चार इंजिनिअर्स होते. त्यांनी आम्हांस पत्र लिहून प्रिन्सिपॉलचे नांव कळवा म्हणजे त्यांचेबरोबर विचारविनिमय करण्यास आम्हांस सोपे जाईल असे कळविले. आम्ही प्रिन्सिपॉलचे म्हणून कराचीचे सेवानिवृत्त प्रि. जी. एन. गोखले हे मिळावेत असा प्रयत्न करीत होतो. त्यांचेकडे सर्व योजना पाठविली. त्यांनी इतकी सविस्तर योजना तयार करणार्‍यांचे कौतुक केलें व संस्थेस यश येण्याची इच्छाही व्यक्त केली. पण वयाच्या ५८ व्या वर्षी पुन: प्रिन्सिपॉलची जबाबदारी पत्करावी असे त्यांस मनापासून वाटेना.

गेली कित्येक वर्षे ते आपल्या आवडीप्रमाणे थिऑसिफिकल सोसायटीचे कार्य करीत होते व आम्ही पत्र पाठविलें तेंव्हा ते अड्यार येथेच होते. श्री. तात्यासाहेब केळकर यांचा पुत्रनिरपेक्ष वात्सल्यसंबंध असूनहि त्यांची प्रवृत्ति या कार्याकडे होईना. त्यानंतर बंगलोर येथील श्री. के. डी. जोशी यांची तात्पुरती संमति मिळविली होती. तसेच संस्थेचें काम अडूं लागलें तर श्री. रा. ब. एन. एस. जोशी यांनी काम करण्याचे कबूल केलें. या दोन जोशींपैकी कोणाचे तरी नांव कळवावे अशा विचारांत होतों. तोच आश्चर्याचा धक्का बसण्यासारखी गोष्ट घडली. प्रि. जी. एन. तथा तात्यासाहेब गोखले यांजकडून २३ ऑक्टोबरला संमतिदर्शक अनुकूल तार आली. त्यांची संमति आल्याने आमची मोठी चिंता दूर झाल्याचा आनंद आम्हांस झाला. त्याबाबत त्यांनी सांगितलेली हकीकत अशी :- थिऑसफिकल सोसायटीचे नवे अध्यक्ष श्री. जिनराजदास यांचेबरोबर श्री. गोखले यांचे मनांत असलेली थिऑसफिकल सोसायटीच्या परदेशातील प्रचाराची योजना कशी प्रचारांत आणावी यासंबंधी विचारविनिमय चालला असतां महाराष्ट्राची शाखा अधिक समृध्द करावयास पाहिजे; तेव्हा तुम्ही पहिले सहा-सात महिने तिकडेच काम करावे हे बरें असे त्यांनी प्रि. गोखले यांना सुचविले. तेंव्हा सांगली इंजिनिअरिंग कॉलेजचे नवे काम मी पत्करावे अशी माझ्या स्नेही मंडळींची विनंती आहे व तें काम या महाराष्ट्राच्या प्रचाराचे कामीं पोषकच ठरणार आहे, तेंव्हा तें मी करावें की काय असे गोखले यांनी त्यांस विचारतांच `हे काम अवश्य स्वीकारावें ` अशी त्यांनी संमति दिल्यामुळे प्रि. गोखले यांस सांगली कॉलेजचे काम स्वकारण्याची स्फूर्ति झाली व `प्रिन्सिपॉलचे काम मी स्वीकारतों ` अशी तार लगेच करून आम्हांस कळविले. या तारेनें आमचा चिंतेचा भाग खूपच हलका झाला व तारेप्रमाणे चारआठ दिवसांत ते पुण्यास येऊन पोचलेही. ताबडतोब आम्ही युनिव्हर्सिटीला कळविले की प्रि. जी. एन. गोखले हे कॉलेजचे प्रिन्सिपॉल म्हणून आमचेतर्फे येणार आहेत. तेव्हा युनिव्हर्सिटीच्या कमिटीने कॉलेजची सर्व माहिती देण्यासाठी आम्हांस मुंबईला बोलविले.